Translate

मंगळवार, ३ डिसेंबर, २०१३

होळीचे रंग …… की रंगांची होळी !

      आपण सगळेच कायम ऐकत आलो आहोत, की एखादी गोष्ट आपल्यापासून लांब गेली की त्या गोष्टीची खरी किंमत कळते. आणि सगळ्यांनी हे कधी ना कधी अनुभवलेलं असेलंच. त्यातलीच एक आता मी पण आहे. चोवीस वर्ष भारतात राहूनही आपल्या सण-वारांपासून मी लांबच होते. 'आपले सण' हा निबंध लिहायला सांगितला, की रुक्षपणे काही माहितीपर शब्द एका पानावर खरडले जायचे. आता वाईट वाटतं, संस्कृतीने इतकी सुंदर, उबदार शाल या सणांच्या रूपाने आपल्याला पांघरली होती, पण तिचं महत्व नवीन कपडे आणि एका निबंधाइतकंच उरलं होतं. आपला देश सोडला आणि या थंड प्रदेशात त्या शालीचं महत्व खऱ्या अर्थाने कळलं. मग मोजकेच का असेना, पण आपली माणसं गोळा करून गणपती, गुढी-पाडवा, संक्रांत, होळी, दिवाळी, असे सगळे सण साता-समुद्रापारदेखील  रुजू लागले. Cambridge मध्ये गोळा झालेला सगळा नवीन गोतावळा सोडून, कामानिमित्त या वर्षी पनामा गाठलं आणि विणत आणलेली शाल पुन्हा उसवल्यासारखी वाटली. मग म्हटलं जाऊ दे , आपले सण या नव्या प्रदेशात नव्या अर्थाने शोधूया, नव्या चष्म्यातून पाहूया ! चष्मा बदलला आणि निसर्गात लपून बसलेले आपले सण उठून दिसायला लागले. अशीच ही माझी पक्षा-प्राण्यांबरोबर, झाडांबरोबर आणि माझ्या फुलपाखरांबरोबरची पहिली-वहिली होळी! 

जांभळा रंग ल्यालेले कृष्णकमळ

रंग माझा वेगळा, ढंग माझा वेगळा!


एकदा कामात मन रमलं की दिवस, आठवडे कसे निघून जातात कळतंच नाही. पानामामधे पहिले दोन महिने भुर्रकन उडून गेले. आजूबाजूला इतकं काही बघण्यासारखं होतं की 'कालनिर्णय' चाही विसर पडला होता. बघता बघता मार्च येउन ठेपला सुद्धा ! घरापासून ग्रीन-हाउस पर्यंतचा रस्ता म्हणजे पर्वणीच असायची. रमत-गमत, फोटो काढत, कामाच्या ठिकाणी वेळेत पोचत यावं म्हणून कितीही लवकर घर सोडलं, तरी अजून वेळ हवा होता असंच वाटायचं. २६ मार्चची सकाळ…… नेहमीप्रमाणे आवरून घर सोडलं. थोडसं चालून पुढे आलं की दाट जंगलाचा एक पट्टा रस्त्याच्या दोन्ही कडांना लागून होता आणि या जंगलात हिरवीगर्द झाडे दाटीवाटीने उभी होती. जरासा रस्ता सोडून पायवाटेने जंगलात शिरलं की टळटळीत ऊन्हंही सावल्यांमधे हरवून जायची. पानांचा रंगही अगदी गडद हिरवा, इतका, की पोपटही आपला पोपटी रंग या पानांत दडवू शकणार नाही. त्या दिवशी मात्र त्या रस्त्याच्या वळणावर आले, आणि थबकलेच ! त्या गर्द वनराईच्या मधोमध एक पिवळाजर्द मोठा ठिपका …… एक झाड आपल्या एकूणएका पानाचा त्याग करून, पिवळ्याधमक फुलांचा डोलारा सांभाळत उभं होतं… अगदी ऐटीत ! 

बहरलेल्या Guayacan चं पाहिलं दर्शन 

ह्या दृष्याचं पाहिलं दर्शनच एक स्मितलकेर चेहेऱ्यावर उमटवून गेलं आणि डोळ्यांनी टिपलेला तो प्रसन्न देखावा मनात खोलवर झिरपत गेला. मग अचानक आठवलं, कालपर्यंत तर या झाडाला एकही फुल नव्हतं …. मग एका रात्रीत असा काय चमत्कार घडला की संपूर्ण झाड फुलांनी बहरून गेलं.… जणू रात्री एखादी परी आपला पिवळा झगा या झाडाला घालून निघून गेली. थोडं पुढे चालून गेल्यावर असंच अजून एक झाड, गर्द हिरव्या वनराईत थाटात उभं होतं. जणू हळदीचा रंग ल्यालेली नवरी, हिरवा शालू नेसून, लाजत बोहल्यावर उभी आहे. 

हळदीने नटलेली नवरी!

चौकशी केल्यानंतर कळलं, की हे Guayacan नावाचं झाड आहे, जे याच दिवसात बहरतं. असं म्हणतात, की हे झाड आपल्या फुलांबरोबर पावसाचा निरोप घेऊन येतं …… कारण, हे साधारणपणे पाऊस सुरु व्हायच्या एक महिना आधी बहरतं. आणि नुसतं बहरत नाही तर संपूर्ण जंगलाला दागिन्यांनी नटवल्यासारखं सजवतं ! माझ्या तिथल्या मैत्रीणीच्याच शब्दात सांगायचं झालं तर, " Discovering a blooming Guayacan tree, is like finding a treasure in a forest !" 

पुढचे दोन दिवस अशीच ठिकठिकाणी ही फुलं फुलत होती. जरा उंचावरून पाहिलं की हिरव्या युनिफॉर्म घातलेल्या मुलांच्या गर्दीतून, पिवळी टोपी घालून आलेली खोडकर मुले डोकं वर काढतायत की काय, असा भास व्हायचा ! चौथ्या दिवशी अचानक हे पिवळे ठिपके त्या हिरव्या गर्दीत लुप्त झाले. जितके अचानक अवतरले, तितकेच अचानक गुडूप झाले.…. मागे उरलं …. एक ओकबोकं झाड ! मी कधी बहरलो होतो हे सांगत…… 

पिवळी टोपी घातलेली खोडकर मुले… :)

त्या रात्री बोलता बोलता आई म्हणाली, "तुझी आठवण काढत, होळीसाठी पुरणपोळी आणि कटाचं सार केलं होतं." …. आणि माझी ट्यूब  पेटली… अरेच्चा ! काल होळी होती नाही का ! आणि मग मनात विचार आला, निसर्गाला कसं कळलं, की बरोब्बर काल होळी होती? जणू ती रंगांची उधळण 'होली मुबारक' म्हणतच झाली होती. या निसर्गाला कशी कळते अचूक वेळ? मग माझा मलाच हसू आलं …. सण आपण निर्माण केले, निसर्गाकडे बघूनच केले, नाही का! होळीसाठीचे रंग आपण निसर्गाकडून घेतले ….  हा, आता ही गोष्ट वेगळी, की या होळीच्या नावाखाली आपणच आपला निसर्ग प्रदूषित करत आहोत, पाण्याचा अपव्यय करतो आहोत. या निसर्गाची सण साजरी करायची पद्धत पहा ना, किती निरुपद्रवी, तरी अत्यंत बोलकी ! हे जाणवलं  मात्र, आणि निसर्गाने त्याच्या प्रत्येक अंशात केलेली रंगांची उधळण प्रकर्षाने दिसून आली. काजूचा लालचुटुक रंग, कैरीचा आंबट हिरवा रंग, मावळतीचा शेंदरी सूर्य, तर पनामा कालाव्यातलं निळशार पाणी. मातीचा तपकिरी सुवास तर सोनटक्कयाचा श्वेतगंध …. आणि माझी फुलपाखरं तर काय, पंखावर इंद्रधनुष्य घेऊनच बागडत असतात. यादी न संपणाऱ्यातलीच आहे!
हे सगळं पाहता, एक प्रश्न मनात सतत घोळत राहतो…. जर आपण आपले सण निसर्गाकडून घेऊ शकतो, तर सण साजरा करायची पद्धत का नाही? या रंगांसाठी आपण होळी साजरी करतो, की होळीसाठी 'रंग उधळतो'? तुम्हाला तुमची खरी उत्तरं सापडली, तर बाकी कुणी जाऊ दे, पण स्वतःपाशी नक्की कबूल करा.





आणि या वेळी मला चक्क अजय-अतुलचं एक गाणं आठवलं ,

संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा !
जगण्याला प्रेमाच्या तुझ्या सुगंध दिला देवा !
फुलाफुलांतून देतो, संदेश आम्हाला देवा,
ऋणी तुझे आम्ही फ़ुलराजा, धन्य झालो देवा !


- सोहिनी